Home Blog “देणे समाजाचे “- एक सद्भावना महोत्सव २०२४

“देणे समाजाचे “- एक सद्भावना महोत्सव २०२४

1145
0

पुण्यातील दिलीप गोखले आणि वीणा गोखले यांच्या प्रयत्नातून सुरु झालेला आणि गेली एकोणीस वर्ष चालू असलेला ‘देणे समाजाचे’ हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे.

“आर्टिस्ट्री” प्रस्तुत “देणे समाजाचे ” हे एक अनोखे व्यासपीठ आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला करून देणे , त्यांना आर्थिक तसेच इतर मदत मिळवून देणे आणि त्याच बरोबरीने समाजालाही त्यांचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून देणे , असा ह्या उपक्रमाच्या मागचा उद्देश आहे. २००५ ते २०२३ ह्या कालावधीत जवळपास २६५ सामाजिक संस्था ह्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि अंदाजे साडेबारा कोटीपेक्षा जास्त निधीची भरीव मदत सेवाभावी संस्थांना मिळवून दिली. सहभागी संस्थांकडून कोणतीही शुल्क आकारणी न करता हा भव्य उपक्रम गेली १९ वर्षे पुण्यामध्ये व्रतस्थपणे राबवला जातो. या सर्व संस्था निवडताना अतिशय काटेकोरपणे निवडल्या जातात जेणेकरून योग्य अशा संस्थाना मदत मिळेल.

ह्या उपक्रमात बीड, सातारा, नाशिक, औंरंगाबाद, अकोला, टिटवाळा, मुंबई, वर्धा उस्मानाबाद, पुणे, ठाणे, जळगांव, सांगोला, राशीन, पैठण, यवतमाळ, कोसबाड अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असणाऱ्या संस्था यावर्षी सहभागी होणार आहेत. अनेकविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ह्या समाजसेवी संस्थांचं कार्य मुळातूनच समजून घेण्यासारखं …. कुणी शैक्षणिक क्षेत्रात, कुणी वंचित घटकातील मुलांच्या संगोपनात, कुणी पशु पक्ष्यांची सेवा करण्यात, कुणी दिव्यांगांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात,कुणी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात, महिला सबलीकरणात, कुणी फासेपारधी मुलांच्या शिक्षण आणि पालन पोषणात, कुणी अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची सेवा करण्यात, कुणी क्रांतीकारकांचं योगदान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात व्यग्र आहे.

अशा वेगवेळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या, प्रामुख्याने ग्रामीण, निमशहरी भागातल्या साधारण २५ सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले जाते. प्रत्येक संस्थेचे प्रतिनिधी त्यांच्या स्टॉलवर माहिती देतात.

समाजात उत्तम काम करणाऱ्या अनेक लोकांशी एकाच वेळी संवाद साधण्याची ही एक उत्तम संधी असते. अनेकांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते पण कुठली संस्था योग्य आहे हा प्रश्न पडतो. ह्याचे उत्तर ह्या प्रदर्शनात मिळेल.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. डोनेशन द्यायलाच हवे अशी सक्ती / सुचना नाही. आपण आर्थिक किंवा इतर स्वरूपातील मदत करू शकता ( सेवा, विशेष कौशल्य वगैरे)

देणगीदार आणि सामाजिक संस्था , यामध्ये एक विश्वासार्ह दुवा ठरलेल्या “देणे समाजाचे ” हा उपक्रम २०१९ पासून मुंबई मधे आणि २०२२ पासून ठाणे येथे आयोजित केला जातो.

तारीख: 13 आणि 14 जानेवारी 2024
वेळ: सकाळी 10 ते रात्री 9
स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र, एम जी रोड, विलेपार्ले.

संपर्क – वीणा गोखले 98220 64129

Facebook Comments